Daraara 24 Taas
जुनगाव आणि देवाडा परिसर अंधारात! रात्रीपासून वीज गायब, नागरिक त्रस्त
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क - पोंभुर्णा
पोंभुर्णा तालुका: जुनगाव आणि देवाडा परिसरातील नागरिक मागील अनेक तासांपासून अंधारात जीवन जगण्यास मजबूर झाले आहेत. काल रात्री 10 वाजल्यापासून वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला असून, सकाळ उलटून गेली तरीही अद्याप वीज परत आलेली नाही.
रात्रभर अंधारामुळे गावांमध्ये अक्षरशः अंधाराचे साम्राज्य पसरले होते. डासांचा प्रचंड उपद्रव निर्माण झाला आहे. लहान मुलांना झोप लागत नसून, घरातील वृद्ध आणि आजारी लोकांचे हाल सुरू आहेत. विजेवर चालणारी फ्रिज, पंखे, मोबाईल चार्जिंग, पाण्याची मोटारसारखी अत्यावश्यक उपकरणं पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे ही समस्या केवळ एकदाच नव्हे, तर वारंवार उद्भवत आहे. दर दोन-तीन दिवसांनी अशा प्रकारे वीज खंडित होणे, ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, महावितरण विभागाने या समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
"आम्ही वेळेवर बिलं भरतो, पण वेळेवर वीज का मिळत नाही?" असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या भागाचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सातत्याने होणाऱ्या वीज खंडितीच्या समस्येचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ताज्या अपडेट्ससाठी व अधिक माहितीसाठी वाचा:
www.darara24news.com
0 टिप्पण्या
Thanks for reading