Advertisement

गडचिरोली जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लाखोंचा अपहार; जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

गडचिरोली जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लाखोंचा अपहार; जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

गडचिरोली | 4 जून 2025 | दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

जिल्हा उपनिबंधक विक्रम सहारे यांना कारणे दाखवा नोटीस; अपहार प्रकरणी जिल्हाधिकारी गंभीर

गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. याच मालिकेत आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा समावेश झाला आहे. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतील लाखोंचा निधी वैयक्तिक नातेवाईकाच्या खात्यात वळविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ३ जून रोजी जिल्हा उपनिबंधक विक्रम सहारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

आदिवासी विकास योजनेअंतर्गत कार्यरत विविध कार्यकारी संस्था आणि सेवा सहकारी संस्थांना भांडवलीदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविली जाते. योजनेअंतर्गत आलेला निधी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील बँक खात्यातून थेट नातेवाईकाच्या खात्यात वळवण्यात आला, अशी गंभीर बाब उघड झाली आहे.

या प्रकरणाची तक्रार भाजप सहकारी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे आणि शिंदेसेनेचे आरमोरी विधानसभा संघटक नारायण धकाते यांनी पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे केली होती.

दहा लाखांचा अपहार, रोखवहीतही अनियमितता

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकृत बँक खात्यातून प्रथम ६ लाख व नंतर ४ लाख, असे एकूण १० लाख रुपये नातेवाईकाच्या खात्यात वळवले गेले. याशिवाय, कार्यालयीन रोखवहीत देखील अनियमितता आढळल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

कारवाईची शक्यता, तीन दिवसांची मुदत

या प्रकारामुळे कार्यालयीन व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी पंडा यांनी विक्रम सहारे यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. त्यांना तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. स्पष्टीकरण समाधानकारक न झाल्यास शिस्तभंगात्मक कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

---

📌 संबंधित घडामोडी:

गडचिरोलीत वन विभागातील टेंडर घोटाळा

आदिवासी योजनांतील निधी गैरवापर: मागील प्रकरणांचा आढावा

---

✍️ लेखक: दरारा न्यूज प्रतिनिधी

📧 संपर्क: news@darara24.com

---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या