🛑 देवाडा खुर्द येथील हनुमान मंदिरातून चांदीचे डोळे चोरीला — अघोरी कृत्याचा संशय, पोलिसांत तक्रार दाखल नाही
📍 पोंभुर्णा (चंद्रपूर) | दरारा 24 तास न्युज नेटवर्क
तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायत परिसरात असलेल्या पुरातन आणि जागृत हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी चांदीचे डोळे लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हनुमान मूर्तीवरील चांदीचे डोळे आणि मूर्तीवरचा शेंदूर काढून नेण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने धार्मिक भावनांनाही धक्का बसला आहे.
🕰️ ही घटना 14 जून रोजी (शनिवारी) रात्रीच्या सुमारास घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या रात्री मंदिरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे डोळे आणि शेंदूर काढून चोरी केली. ही बाब दोन दिवसांनी, म्हणजे 16 जून रोजी नागरिकांच्या लक्षात आली.
👥 गावकऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये यश आले नाही. काही ग्रामस्थांनी या चोरीमागे अघोरी विद्या करणाऱ्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🚨 विशेष म्हणजे, या गंभीर घटनेनंतर आठवडा उलटूनही अजूनपर्यंत पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे तपासाची प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही.
💬 सध्या या प्रकाराची गावात जोरदार चर्चा असून, ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची आणि या प्रकरणाचा तत्काळ तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
📌 दरारा 24 तास न्युज नेटवर्क या घटनेचा पाठपुरावा करत राहील.
0 टिप्पण्या
Thanks for reading