टावर आहे नावाला – नेटवर्क नाही गावाला!
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुजरूक गावातील जिओ व बीएसएनएल नेटवर्क समस्या गंभीर बनली
दरारा 24 तास न्युज नेटवर्क |
चंद्रपूर (प्रतिनिधी):
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुजरूक हे गाव आजही मोबाईल नेटवर्कच्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. गावात जिओ कंपनीचा टॉवर असूनही, गावापासून अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर नेटवर्कचा पूर्णपणे अभाव आहे. परिणामी, गावकऱ्यांना दैनंदिन संवाद साधण्यास मोठा अडथळा येत आहे.
ग्रामस्थांनी भरवशाने जिओचे फोरजी रिचार्ज केले, मात्र नेटवर्कच्या अनुपलब्धतेमुळे हे रिचार्ज अक्षरशः वाया जात आहेत. अनेक ग्राहक यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करत आहेत.
त्यातच बीएसएनएलच्या जाहिरातींनी आश्वासन दिल्यामुळे काही लोकांनी आयडिया, एअरटेल व इतर नेटवर्क सोडून बीएसएनएलमध्ये सिम कन्व्हर्ट केली, परंतु ती निवड देखील फसवी ठरली. बीएसएनएलचे नेटवर्क जवळजवळ नामशेष असून, केवळ नावापुरते उरले आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे:
"मोबाईल हे आजच्या काळात गरजेचे साधन झाले आहे. ऑनलाईन शिक्षण, बँकिंग सेवा, आरोग्यविषयक सल्ला, शासकीय योजना यासाठी नेटवर्क आवश्यक आहे. मात्र, आमच्याकडे रेंजच मिळत नाही. टॉवर असूनही रेंज मिळत नसेल, तर दोष कुणाचा?" असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक प्रशासन व दूरसंचार कंपन्यांकडे मागणी:
ग्रामस्थ व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी जिओ व बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या, परंतु ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
शासनाचा हस्तक्षेप गरजेचा:
शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाचे स्वप्न ग्रामीण भागात असे अपयशी ठरत असल्यास, हा प्रकल्प केवळ कागदावरच मर्यादित राहणार आहे. देवाडा बुजरूकसारख्या गावात नेटवर्क सुविधा सक्षम होणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून ग्रामीण भागही खऱ्या अर्थाने डिजिटल होऊ शकेल.
---
रिपोर्टर – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क, पोंभुर्णा तालुका
0 टिप्पण्या
Thanks for reading