Advertisement

रस्त्यांची ऐशीतैशी : देवडा बुज ते घोसरी फाटा दरम्यान रस्त्याची गंभीर अवस्था – शेतकरी व नागरिक संतप्त

रस्त्यांची ऐशीतैशी : देवडा बुज ते घोसरी फाटा दरम्यान रस्त्याची गंभीर अवस्था – शेतकरी व नागरिक संतप्त


पोंभुर्णा (ता. प्रतिनिधी) | प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे पाइपलाइन टाकण्याचे काम करताना ठेकेदाराने देवडा बुज ते घोसरी फाटा या मुख्य रस्त्याची अक्षरशः ऐशी तैशी केली आहे. डांबरीकरण झालेल्या रस्त्याला मधोमध फोडून पाइप टाकण्यात आले असून, काम झाल्यानंतर खड्डे बुजवले गेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे सरळ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून, ही निष्काळजीपणाची बाब प्रचंड संतापजनक ठरत आहे.

मृत्यूला निमंत्रण देणारा रस्ता

या रस्त्याची दुरवस्था इतकी भयावह झाली आहे की, या रस्त्यावरून चालणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे ठरत आहे. 13 एप्रिल 2025 रोजी जूनगावचे पोलीस पाटील श्री. कानोजी पाटील भाकरे यांचा ठेकेदाराच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताचे कारण रस्त्याची खराब अवस्था व ठेकेदारांची बेपर्वाई असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतरही कोणतीही जबाबदारी स्वीकारली गेली नाही, तसेच मृताच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.

शेतकऱ्यांचेही हाल – शेती उद्ध्वस्त, परतफेड नाही

या पाइपलाइन प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून काम करण्यात आले. पाइप टाकण्यासाठी शेती उद्ध्वस्त झाली; मात्र आजतागायत त्या शेतकऱ्यांना कुठलीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. "रस्त्याच्या प्रमाणे आमच्या शेताचीही ऐशी तैशी झाली आहे. पाइप टाकल्यानंतर माती भरून गेले, नांगरता येत नाही, पीक घेताच येत नाही – याची जबाबदारी कोणाची?" असा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

कोट्यवधींचा निधी वाया – प्रशासन गप्प

या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. अत्यंत चांगल्या प्रतीचा रस्ता नागरिकांना मिळाला होता. मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे काही महिन्यांतच त्याचा अक्षरशः चुराडा झाला आहे. ठेकेदारांकडून पाइपलाइन टाकून काम पूर्ण झाल्यानंतर मूळ रस्ता पूर्ववत करण्यात यावा, हे बंधनकारक असतानाही याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे.

शिवसेनेची मागणी – ठेकेदारावर कारवाई करा, रस्ता दुरुस्त करा

या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री. जीवनदास गेडाम यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,

🔗ठेकेदाराने उध्वस्त केलेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत करावा

🔗 पोलीस पाटील भाकरे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी

🔗 शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी

🔗 सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे

लोकशाहीत नागरिक आवाज उठवणारच – प्रशासन काय पावले उचलेल?

रस्त्याचा मुद्दा केवळ प्रवासाचा नाही, तर नागरिकांच्या जीविताचा व शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा आहे. जर प्रशासन वेळेत योग्य पावले उचलणार नसेल, तर नागरिकांचा उद्रेक अटळ ठरेल, असे इशारे स्थानिकांनी दिले आहेत. आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या कृतीकडे लागले आहे.
---
संपर्कासाठी:
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
ई-मेल: daraaraa999@gmail.com contact@darara24news.in ()
प्रतिनिधी: []

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या