"शेण" खाणारे! ३२ लाखांच्या गोबर घोटाळ्यात ८ वनाधिकारी निलंबित
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | चंद्रपूर
राजुरा तालुक्यातील विरूर वनपरिक्षेत्रात जुलै ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३२ लाख ६८ हजार रुपयांच्या गोबर खरेदीतील घोटाळ्याप्रकरणी वन विभागात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पाच वनरक्षक आणि दोन वनपाल यांना निलंबित करण्यात आले असून, याआधीच एक वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित झाला होता. त्यामुळे निलंबित अधिकाऱ्यांची संख्या आठवर पोहोचली आहे.
काय आहे प्रकरण?
विरूर वनपरिक्षेत्रात वृक्षारोपणानंतर जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी गोबर खरेदी करून वापरण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, जुलै ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत प्रत्यक्षात गोबर खरेदीच न करता, बनावट देयकांच्या माध्यमातून सुमारे ३२,६८,६०८ रुपयांचा अपहार करण्यात आला.
तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी आपल्या अधीनस्थ कर्मचार्यांच्या मदतीने ही बनावट देयके सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
निलंबित अधिकारी कोण?
मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आणि उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू (मध्यचंदा विभाग) यांच्या संयुक्त आदेशानुसार खालील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे:
वनपरिक्षेत्र अधिकारी: सुरेश येलकेवाड
वनरक्षक: संतोष संगमवार (विरूर), इक्बाल शेख (सिद्धेश्वर), गोपीचंद राठोड (चिंचोली), कुंडलिक कोळेकर (सिद्धेश्वर)
वनपाल: अश्विनी ताजणे (विरूर), लक्ष्मी आडे (सोंडा), ए.व्ही. मस्तान (डोंगरगाव)
या बनावट देयकांद्वारे विरूर २, चिंचोली ४, कवितपेठ २, भेंडाळा १, सोंडो २, सिद्धेश्वर २ आणि डोंगरगाव १ अशा १४ गवत लागवडीच्या ठिकाणी खर्च दाखवून रकमेचा अपहार करण्यात आला.
कारवाईची गती
या घोटाळ्याची माहिती मिळताच मुख्य वनसंरक्षक डॉ. रामगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले. उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी सखोल चौकशी करून २६ मे २०२५ रोजी अहवाल सादर केला. अहवालात दोष सिद्ध झाल्याने संबंधितांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली.
---
- एम. बी. दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी, विरूर स्टेशन
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
(तारीख: ५ जून २०२५)
0 टिप्पण्या
Thanks for reading