Advertisement

चंद्रपूर बँक निवडणूक: मतदान केंद्रावर दोन उमेदवारांत जोरदार झटापट, तणावाचे वातावरण!



🔴 चंद्रपूर (10 जुलै) – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी गुरुवारी पार पडत असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान चंद्रपूर तालुका "अ" गटातील दोन उमेदवारांमध्ये तुफान वाद झाला. इंडस्ट्रियल इस्टेट येथील मतदान केंद्रात दिनेेश चोखरे आणि सुभाष रघाटाटे यांच्यात सुरू झालेला शाब्दिक वाद काही क्षणातच शिवीगाळ आणि धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला.

स्थानिक पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यामुळे मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला असून, दोन्ही उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने केंद्राबाहेर जमा होऊ लागले आहेत.


प्रशासन अलर्ट! कडक बंदोबस्त तैनात

प्रसंगाच्या गांभीर्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, कोणत्याही बाहेरील व्यक्तीस प्रवेश नाकारण्यात येत आहे. दरम्यान, उमेदवार सुभाष रघाटाटे यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राचे दरवाजे आतून बंद करत मतदान प्रक्रिया अडवण्याचा प्रयत्न केला, तर चोखरे समर्थकांनी बाहेरून जोरदार विरोध करत दरवाजे ठोठावले.

या प्रकारामुळे काही काळासाठी मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला. परिणामी, उमेदवार दिनेश चोखरे यांनी संबंधित केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी केली आहे.


राजकीय वजनदारांची निवडणूक

या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तब्बल १३ वर्षांनंतर बँकेच्या निवडणुका होत असून, सहकार क्षेत्रात ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. एकूण २१ संचालक पदांपैकी १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित ८ जागांसाठी मतदान सुरू आहे. या जागांमध्ये ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आणि भटक्या विमुक्त प्रवर्गाचा समावेश आहे.

अ गटात एका मताची किंमत ५ लाख रुपयांपर्यंत असून, ब गटात ती १५ ते २० हजार रुपयांपर्यंत आहे. मतदानासाठी १४ तालुक्यांतील १४ मतदान केंद्रांवर १०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी उद्या ११ जुलै रोजी चांदा इंडस्ट्रियल इस्टेट, चंद्रपूर येथे होणार आहे.


राजकीय वर्चस्वासाठी टोकाची टक्कर

या निवडणुकीत काँग्रेसकडून खासदार प्रतिभा धानोरकर व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे समन्वय, तर भाजपकडून आमदार बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नसून, राजकीय प्रतिष्ठेची लढत बनली आहे.


🛑 मतदान प्रक्रियेला गालबोट लागल्याने प्रशासनाचीही तारांबळ उडाली आहे. निवडणूक पारदर्शक व्हावी, यासाठी प्रशासन अधिक दक्ष झाले असून, जिल्ह्यभरात तणावपूर्ण वातावरण आहे.


▪️ रिपोर्ट - दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
▪️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या