🚨 पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्यावे – तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांची मागणी
पोंभूर्णा (प्रतिनिधी) –
पोंभूर्णा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील रुग्णांना प्रत्येक वेळी ५० किमी अंतरावर असलेल्या चंद्रपूर येथे धाव घ्यावी लागत असून, वेळ, पैसा आणि आरोग्य या तिन्ही बाबतीत त्यांना मोठ्या समस्या उद्भवत आहेत.
या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांनी शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ही मागणी दिनांक १४ ऑगस्ट रोजी नागपूर येथे झालेल्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत निवेदनाद्वारे करण्यात आली. या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला.
🔹 ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत – पण सुविधा अपुऱ्या!
पोंभूर्णा तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यात सुमारे ५५ ते ६० हजार लोकसंख्या असून, नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने तब्बल १४ कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च करून ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत उभारण्यात आली आहे. मात्र या रुग्णालयात आजही फक्त एक एक्स-रे मशीन उपलब्ध असून, सोनोग्राफीसह अनेक महत्त्वाची उपकरणे उपलब्ध नाहीत. त्यामुळे गंभीर व अतिगंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण झाले आहे.
विशेषतः गर्भवती माता, जोखमीच्या माता, तसेच किडनी, लिव्हर, अपेंडिक्स आदी आजारांचे रुग्ण यामुळे मोठ्या अडचणीत सापडतात. तालुक्यातील शेकडो रुग्णांना केवळ सोनोग्राफीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते, ही बाब संतापजनक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
🔹 “सोनोग्राफी मशीन मिळाल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल” – पंकज वडेट्टीवार
यावेळी बोलताना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार म्हणाले की,
“पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्याने रुग्णांना व डॉक्टरांना प्रचंड अडचण येते. हे मशीन मिळाल्यास नागरिकांना तात्काळ तपासणीची सुविधा मिळेल व डॉक्टरांना उपचार करण्यात सुलभता येईल. उपमुख्यमंत्री यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे.”
🔹 शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या मागणीसाठी झालेल्या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर, युवासेना जिल्हा प्रमुख शैलेश केळझरकर, विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर, पोंभूर्णा तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार, बल्लारपूर तालुका प्रमुख जमील शेख, मूल शहर प्रमुख विशाल नागुलवार, तसेच उमेश कुंडले व इतर कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✅
0 टिप्पण्या
Thanks for reading