— दरारा 24 तास
बल्लारपूर कॉलरी ग्राउंडचे साडेसहा कोटींचे काम ठप्प — खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी
बल्लारपूर (प्रशांत रणदिवे, ता.प्र.)
बल्लारपूर येथील कॉलरी ग्राउंडच्या नूतनीकरणाच्या कामात साडे सहा कोटी रुपयांचा निधी खर्चासाठी मंजूर असूनही काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे खेळाडू आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या मैदानाच्या विकासासाठी तत्कालीन मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून साडे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हे काम नागपूर येथील एम.आर. ढोबळे कंपनीला सोपविण्यात आले. मात्र, ढोबळे यांनी हे काम गणवीर नामक उपकंत्राटदाराला दिले असून, त्यांची निष्क्रियता आणि कामातील उदासीनतेमुळे संपूर्ण प्रकल्प ठप्प झाला आहे.
काम सुरू होऊन तब्बल १६ महिने उलटूनही मैदानाचा समतलीकरणाचा टप्पा पूर्ण झालेला नाही. उलट मैदानावर माती, गिट्टी आणि निकृष्ट दर्जाच्या काळ्या वाळूचा वापर केल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून येत आहेत. मैदानावर प्रत्यक्ष काम थांबलं असतानाही काही ठिकाणी शौचालय आणि मूत्रालय बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे, मात्र मुख्य मैदानाचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही.
स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हे काम १८ महिन्यांत पूर्ण व्हायचे होते, परंतु ठेकेदारांच्या अकार्यक्षमतेमुळे कामाची गती कासवाच्या चालाने सुरू आहे. यामुळे टीपीएलचे खेळाडू तसेच स्थानिक क्रीडाप्रेमी निराश झाले आहेत.
अनेक खेळाडू मैदानाच्या अभावामुळे स्थानिक स्पर्धांमधून वंचित राहात आहेत. नागरिकांचा आरोप आहे की, ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यातील दुर्लक्ष आणि निष्क्रियता यामुळे सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत आहे.
दरम्यान, ठेकेदार ढोबळे यांनी अलीकडेच सुपरवायझरमार्फत दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून, त्या वेळी कॉलरी ग्राउंडवर टीपीएलचे खेळाडूही उपस्थित होते. आता सर्वांचे लक्ष पुढील दोन महिन्यांत खरोखरच हे काम पूर्ण होते का, याकडे लागले आहे.
स्थानिक नागरिक आणि खेळाडूंची मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचा तात्काळ आढावा घेऊन जबाबदार ठेकेदारावर कठोर कारवाई करावी.




0 टिप्पण्या
Thanks for reading