Advertisement

वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्वबळावर उतरणार

 


वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्वबळावर उतरणार
— पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी, दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

पोंभुर्णा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपल्या संघटनात्मक बळावर स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पोंभुर्णा तालुक्यातील दोन जिल्हा परिषद क्षेत्रे व चार पंचायत समिती गणांवर पक्ष आपले उमेदवार उभे करणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

दिनांक 8 नोव्हेंबर रोजी श्यामभाऊ गेडाम यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तालुका अध्यक्ष तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या प्रतिनिधींसह सर्वच आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत देवाडा पंस क्षेत्रात सुप्रसिद्ध पत्रकार, समाजसेवक आणि दलित चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते रुपेश निमसरकार यांना पक्षाने अधिकृत तिकीट जाहीर केली आहे. समाजातील सर्व घटकांशी जोडलेले आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेणारे निमसरकार हे उमेदवार म्हणून मैदानात उतरणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तालुक्यातील उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांवर लवकरच उमेदवारांची नावे घोषित केली जाणार असल्याची माहिती तालुका अध्यक्षांनी दिली. “वंचित बहुजन आघाडी ही समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर लढणारी संघटना असून, कोणत्याही आघाडीवर किंवा पक्षावर अवलंबून न राहता आम्ही जनतेच्या बळावर स्वबळावर निवडणुकीत उतरणार आहोत,” असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत आगामी निवडणूक रणनिती, मतदारांशी थेट संपर्क अभियान, बूथस्तरीय संघटन बळकटीकरण, व प्रचार यंत्रणा राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः तरुण वर्गात निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, “वंचित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरेल,” असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

उपस्थित: तालुका अध्यक्ष, श्यामभाऊ गेडाम, नगरसेवक अतुल वाकडे, अविनाश वाळके, रुपेश निमसरकार, भडके साहेब, रवींद्र तेलसे साहेब,महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवक आघाडी कार्यकर्ते, तसेच विविध गावातील पक्षाचे कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या