दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
काँग्रेसला मोठा धक्का!
जेष्ठ नेते प्रकाश पाटील मारकवार यांचा पुत्रासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश
▶ नागपूर | प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाला चंद्रपूर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच मराठी चित्रपटाचे निर्माते प्रकाश पाटील मारकवार यांनी आपले पुत्र अंजिक्य मारकवार यांच्यासमवेत आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाचा झेंडा देत त्यांचे स्वागत केले.
प्रकाश पाटील मारकवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक अनुभवी व प्रभावशाली राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जिल्हा परिषद अध्यक्षपदासह त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द दीर्घ आणि प्रभावी राहिली आहे.
मुल–बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस पक्षाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना उमेदवारी दिल्याने प्रकाश पाटील मारकवार यांची मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे नाराज होत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.
मुल–बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे नेतृत्व भाजपचे जेष्ठ नेते व राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार करीत आहेत. अशा परिस्थितीत प्रकाश पाटील मारकवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये झालेला प्रवेश आगामी राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या प्रवेशामुळे मुल–बल्लारपूर मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला याचा निश्चितच फायदा होईल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.





0 टिप्पण्या
Thanks for reading