अवैध वाळू उपशाला चाप-
जुनगाव वाळूघाटावर एसडीओ लघीमा तिवारी यांची मोठी कारवाई
🔴 रात्रीच्या अंधारात अवैध वाळू उपशावर घाव
जुनगाव वाळूघाटावर एसडीओंचा धडक छापा; विना क्रमांकाचा पोकलॅण्ड जप्त
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | प्रतिनिधी – चंद्रपूर
पोंभूर्णा, ता. 14 : तालुक्यातील जुनगाव येथील वैनगंगा नदीवरील वाळूघाटावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी यांनी पथकासह रात्री साडेआठच्या सुमारास अचानक छापा टाकून वाळू उपसा करत असलेला विना क्रमांकाचा पोकलॅण्ड मशीन ताब्यात घेतला आहे.
जुनगाव परिसरात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ११ डिसेंबर रोजी रात्री ही धडक कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक पाहताच पोकलॅण्ड मशीनचा चालक व इतर मजूर घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले.
जप्त करण्यात आलेले पोकलॅण्ड मशीन महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून, संबंधित ठेकेदार व मशीन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी, तहसीलदार मोहनिश शेलवटकर, मंडळ अधिकारी सुनील चौधरी, दिनकर शेडमाके, तलाठी वीरेंद्र वाळके, आसिफ पठाण, क्षितीज दुपारे, नीलेश मत्ते आदींच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली.
विशेष म्हणजे, मागील पंधरा दिवसांत पोंभूर्णा तालुक्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात एकूण चार मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून, या कारवायांमधून सुमारे ३६ लाख रुपयांचा महसूल शासनाकडे जमा करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे अवैध वाळू उपशावर आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





0 टिप्पण्या
Thanks for reading