Advertisement

दोन महिन्यांपासून हातपंप बंद; ग्रामपंचायत करते तरी काय? संतप्त महिला व नागरिकांचा संतापाचा सवाल

 

दोन महिन्यांपासून हातपंप बंद; ग्रामपंचायत करते तरी काय?



संतप्त महिला व नागरिकांचा संतापाचा सवाल

जुनगाव | प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

जुनगाव येथील सुरेश नारायण मेश्राम यांच्या घराजवळील बोरवेल/हातपंप मागील दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून बंद अवस्थेत असून, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, महिलांना व वृद्धांना दूरवरून पाणी आणण्याची वेळ येत आहे.

स्थानिक नागरिकांनी व महिलांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. केवळ पाहणीची आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात हातपंप दुरुस्ती अथवा पर्यायी पाणीपुरवठ्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पाणीपुरवठा हा ग्रामपंचायतीचा मूलभूत प्रश्न असून, अशा प्रकारे दीर्घकाळ हातपंप बंद राहणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणीटंचाईमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून स्वयंपाक, स्वच्छता व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. विशेषतः महिला व मुलांना याचा मोठा फटका बसत आहे.

“पाणी ही जीवनावश्यक गरज आहे. दोन महिने उलटूनही समस्या कायम राहणे म्हणजे ग्रामपंचायतीचे दुर्लक्षच आहे,” असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर हातपंप दुरुस्ती करावी अथवा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, ही पाणी समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे. परिस्थिती केव्हा भडका घेईल, हे सांगणे कठीण असल्याने संबंधित विभाग व ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या