Advertisement

बल्लारपूर नगर परिषद इमारत बांधकामस्थळी कामगाराचा संशयास्पद मृत्यू, प्रशासन व ठेकेदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


बल्लारपूर :

बल्लारपूर नगर परिषदेच्या बांधकामाधीन इमारतीत काम करणाऱ्या एका तरुण मजुराचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोस्टमार्टम अहवाल व पोलीस तपासानंतरच सत्य समोर येणार आहे.

हीरालाल सुंदरसिंह (वय २८), रा. छुरिया, गेंडाटोला, मातेखेड़ा, जिल्हा राजनांदगाव (छत्तीसगड) असे मृतकाचे नाव आहे. बल्लारपूर नगर परिषद इमारतीचे बांधकाम सध्या सुरू असून, हीरालाल हे तेथे मजूर म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर बल्लारपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र कामाच्या ठिकाणीच किंवा कामादरम्यान त्यांची प्रकृती अचानक अधिक खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांना तातडीने कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आज सकाळी मृतकाचे नातेवाईक बल्लारपूर येथे दाखल झाले असून, पोस्टमार्टम प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह छत्तीसगड येथे नेण्यात आला.

पोस्टमार्टम अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण आजारपण, दारूचे सेवन की कामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्लक्षामुळे घडलेला प्रकार आहे, हे स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे मृतकाला दारूचे व्यसन असल्याची चर्चा असून, त्यामुळे या घटनेबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर नगर परिषद प्रशासन व संबंधित ठेकेदारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नियमांनुसार बांधकामस्थळी कामगारांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा, प्राथमिक उपचार, सुरक्षितता साधने व आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र उपचारांच्या अभावामुळेच हा मृत्यू झाला असल्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जंगमवार करीत आहेत. प्रशासनाने या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या