Advertisement

ऊसतोड मजुराची पत्नी बिबट्याला भिडली; धैर्यामुळे पतीचा जीव वाचला!

 

ऊसतोड मजुराची पत्नी बिबट्याला भिडली; धैर्यामुळे पतीचा जीव वाचला!


नाशिक | प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

नाशिक जिल्ह्यातील उंबरखेड शिवारात माणुसकी, प्रेम आणि धैर्याची थरारक कथा समोर आली आहे. ऊसतोड काम करत असताना दोन बिबट्यांनी संतोष चव्हाण या ऊसतोड मजुरावर अचानक हल्ला केला. क्षणातच परिस्थिती जीवघेणी बनली. मृत्यू समोर उभा असतानाही संतोष यांच्या पत्नी आवताबाई चव्हाण यांनी हार मानली नाही.

पतीवर बिबट्यांनी झडप घातलेली पाहताच आवताबाई यांनी क्षणाचाही विलंब न करता हातात ऊसाचे दांडकं घेतले आणि रणरागिणीप्रमाणे थेट बिबट्यांवर धाव घेतली. जोरजोरात आरडाओरड करत त्यांनी बिबट्यांना मारहाण केली. पत्नीच्या अनपेक्षित प्रतिकारामुळे घाबरलेले बिबटे काही क्षणातच जंगलाच्या दिशेने पळून गेले.

या धाडसामुळे संतोष चव्हाण यांचा जीव वाचला. मात्र, हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदत केली आणि वनविभागाला कळवले.

या घटनेमुळे उंबरखेड शिवारासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

पत्नी आवताबाई चव्हाण यांचे हे धैर्य केवळ एका पत्नीचे प्रेम नाही, तर संकटासमोर न झुकणाऱ्या स्त्रीशक्तीचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या या शौर्याची सर्वत्र चर्चा होत असून, अनेकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. पतीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांकडून कळले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या