दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
चंद्रपूर / प्रतिनिधी
समाजकार्यात आघाडीवर, की समाजासाठी धोकादायक? वैभवच्या कार्याची चर्चा पराकोटीला
गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील समस्यांसाठी सातत्याने आवाज उठवणारे, गरजूंच्या मदतीसाठी तत्पर धावून जाणारे वैभव यांच्या कार्याची आज जिल्हाभरात व्यापक चर्चा होत आहे. समाजहितासाठी अहोरात्र झटणारा हा युवा कार्यकर्ता काहींच्या मते “समाजासाठी धोकादायक” असल्याची उपरोधिक टीका नुकतीच करण्यात आली. मात्र वास्तव चित्र काहीसे वेगळे असल्याचे नागरिक सांगत आहेत.
रुग्णांना मदत करणे, अपघातग्रस्तांना उपचारापर्यंत पोहोचवणे, मृतदेह घरी नेण्यासाठी वाहन व्यवस्था करणे अशा अनेक सेवाकार्यात वैभव अग्रस्थानी राहिला आहे. गावपातळीवरील समस्या—पाणी, जलसंधारण, रस्ते, अनुदान, शेतकरी हित—या विषयांवर सातत्याने पाठपुरावा करून अनेकांना दिलासा मिळवून दिल्याचा दावा स्थानिक नागरिक करत आहेत.
शेतकऱ्यांना शेतात विजेची सुविधा उपलब्ध व्हावी, पांदन रस्ते तयार व्हावेत, विविध मागण्यांसाठी आंदोलन करून त्यांचे हक्क मिळवून देण्याची लढाई वैभवने उभी केली. तसेच शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या टोक येथील 51 कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून देण्याचे मोठे काम त्याच्या माध्यमातून पार पडले.
दुषित पाणी पिण्याच्या विवशतेत जगणाऱ्या गावासाठी प्रशासनाविरुद्ध आंदोलन छेडून त्या गावात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यास वैभवने सरकारला भाग पाडले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांविरोधात लढा देत, त्यांचा गैरव्यवहार उघड करत शासनाचा निधी पुन्हा शासकीय तिजोरीत जमा करण्यास तो कारणीभूत ठरला.
ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षकांची सुविधा मिळावी म्हणून जिल्हा परिषद कार्यालयावर आंदोलन करणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्याची मागणी शासनाकडे ठेवणे—अशा विविध क्षेत्रात त्याची भूमिका ठळक राहिली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की— “जो समाजासाठी लढतो, गरीबांच्या मदतीसाठी उभा राहतो, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो… तोच आज काहींसाठी धोकादायक ठरत आहे का?”
समाजकार्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीवर अशी उपरोधिक टीका होत असताना, यामागील खरे कारण राजकीय मतभेद की वैभवची वाढती लोकमान्यता—हा प्रश्न स्थानिक पातळीवर चर्चेत आहे.
— दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
चंद्रपूर
लेखक - अविनाश वाळके, सामाजिक कार्यकर्ते पोंभुर्णा




0 टिप्पण्या
Thanks for reading