Advertisement

सावली परिक्षेत्रातील पाथरी येथे वाघाचा संशयास्पद मृत्यू; अवयव गायब, चार आरोपी ताब्यात

  


🚨 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | सविस्तर बातमी 🚨

चंद्रपूर : सावली परिक्षेत्रातील पाथरी येथे वाघाचा संशयास्पद मृत्यू; अवयव गायब, चार आरोपी ताब्यात

चंद्रपूर वनविभागांतर्गत सावली परिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रात एका वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दिनांक 23 मार्च 2026 रोजी राखीव वन कक्ष क्रमांक 298 मध्ये वाघाचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे, घटनास्थळी वाघाचे काही अवयव गायब असल्याचेही निदर्शनास आले असून वन्यजीव तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्राप्त तक्रारीनंतर वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दुपारी सुमारे 12 वाजता तपासणीदरम्यान वाघाचे अवशेष कुजलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी वनविभागाने तातडीने प्राथमिक गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनअधिकारी राजन तलमले यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) वि. एस. तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्यासह पथक सखोल तपास करत आहे.

प्राथमिक चौकशीनंतर चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सावली येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने त्यांना 24 मार्च 2026 रोजी तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला असून लवकरच सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे.

तपासामध्ये NTCA प्रतिनिधी बंडू धोत्रे, तसेच WPSI प्रतिनिधी मुकेश भांडक्कार आणि उमेशसिंह झिरे यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे.

👉 वन्यजीव संरक्षणासाठी मोठे आव्हान- या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाघासारख्या संरक्षित प्राण्याच्या मृत्यूमुळे वनविभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.


#BreakingNews #Chandrapur #TigerDeath #WildlifeCrime #ForestDepartment #Darara24TaasNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या