चंद्रपूर : जिल्हा काँग्रेस (ग्रामीण) अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. संघटनेत हालचालींना वेग आला असून, मोरवा येथील माजी सरपंच व विद्यमान तालुका काँग्रेस अध्यक्ष शामकांत सीताराम थेरे यांनी या पदासाठी आपली उमेदवारी ठामपणे मांडली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संतोषजी कोलकोंडा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभयजी छाजेड यांची भेट घेत त्यांनी अधिकृत अर्ज सादर केला. या वेळी त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या दाव्याची ताकद स्पष्टपणे दिसून आली.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या थेरे यांनी स्वतःच्या कष्टावर राजकारणात स्थान निर्माण केले आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी सरपंचपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी नेतृत्वाची सुरुवात केली. स्व. इंदिरा गांधी आणि स्व. राजीव गांधी यांच्या विचारसरणीने प्रेरित होत त्यांनी युवक काँग्रेसमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष अशी विविध पदे सांभाळत त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
राजकीय संघर्षाच्या काळातही त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात त्यांनी वेळोवेळी आंदोलन छेडले, ‘जेलभरो’ आंदोलनात सहभाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. त्यामुळे त्यांची प्रतिमा एक लढवय्या आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम उभा राहणारा नेता अशी निर्माण झाली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या विजयामागे त्यांच्या संघटन कौशल्याचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्ह्यात काँग्रेसचा विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
“पद हे ध्येय नसून जनसेवा हीच खरी जबाबदारी आहे,” असे मत व्यक्त करत त्यांनी आपल्या भूमिकेची जाणीव करून दिली. त्यांच्या दांडगा जनसंपर्क, अनुभव आणि नेतृत्व क्षमतेमुळे जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत ते सध्या आघाडीचे आणि प्रभावी दावेदार म्हणून उदयास येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
– दरारा 24 तास न्यूज नेटवर्क




0 टिप्पण्या
Thanks for reading