दिवाळीनिमित्त पत्रकारांना भेटवस्तू दिल्या जातात, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु यावर्षीच्या दिवाळीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 50 हजारांची गिफ्ट कार्ड दिल्यामुळे राज्यातील पत्रकारांच्या वर्तुळात हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. या चर्चेला अनेक फाटे फुटले असून आता ही चर्चा थेट दिल्ली दरबारी पोहोचल्याचेही समजते आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीत महाराष्ट्रातील बहुसंख्य पत्रकार आहेत. त्यांना पत्रकारांच्या ग्रुपमध्ये 'लष्कर- ए - देवेंद्र' म्हणून संबोधले जाते. या 'लष्कर - ए - देवेंद्र'मधील सर्वच ( नैतिकतेचा बुरखा पांघरलेले ) पत्रकार व संपादक यांना फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावले होते. तेथे त्यांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर त्यांना निमूट लाईनीत उभे करण्यात आले व ५० हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. हे गिफ्ट व्हाउचर रिलायन्स कंपनीचे आहे. त्यामुळे ही 'दिवाळी' मिळावी म्हणून एकाच वृत्तपत्र व चॅनेलमधील ४ ते ५ जण उत्सुक होते.
या सर्वांना रिलायन्सची गिफ्ट व्हाउचर्स मिळालेली आहेत. या माध्यमातून फडणवीसांनी ऐन दिवाळीत विकृत पायंडा पाडला आहे. खरे तर याची लोकायुक्तांकडे तक्रार करायला हवी पण मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार, हा खरा प्रश्न आहे.
आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीनिमित्त पत्रकारांना स्नेहभोजन देण्यात येणार आहे. आधीपासूनच 'गिफ्ट' देण्यासाठी प्रसिद्ध असणारे एकनाथ शिंदे आता तर थेट मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या दरबारात किती रुपयांची गिफ्ट व्हाऊचर्स पत्रकारांना दिली जाणार आहे, यात्री उत्सुकता प्रसारमाध्यमांमध्ये आहे.
फडणवीस यांचा कथित दानधर्म
दिवाळी म्हणली की भेट किंवा भेटवस्तू आलीच. एरवी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढणा-या मीडियामध्ये पूर्वीपासूनच दिवाळीचे अप्रूप आहे. सत्ताधारी वर्ग त्याचबरोबर अन्य माध्यमांतूनही पत्रकारांना या काळात भेटी मिळतात. पण यावर्षी दिवाळी गाजतेय ती फडणवीसांच्या मोठ्या गिफ्टमुळे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असतानाही त्यांनी कधी गिफ्ट व्हाउचर्स किंवा तत्सम रक्कम पत्रकारांना देण्याचे प्रकार केले नव्हते. पण यावेळी त्यांच्याकडुन तब्बल 50 हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर्स दिले गेल्यामुळे माध्यम वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले गेले. वास्तविक असले प्रकार याआधी एकनाथ शिंदेंकडून व्हायचे. मात्र फडणवीस अशा 'कथित' दानकार्यासाठी कधीही प्रसिद्ध नव्हते. परंतु यावेळी याबाबतीत शिंदेना आपण 'ओव्हरटेक' करू, या विचाराने असेल, फडणवीसांनी हा 'प्रताप' केला.
पण त्यांच्या या महाप्रतापाचीही चर्चा थेट दिल्ली दरबारी पोहोचल्यामुळे त्यांची सध्या कुचंबणा झाल्याची माहिती मिळालेली आहे.
अमित शहा - शिंदे एकत्र, फडणवीस अस्वस्थ
=========================
गेल्या काही दिवसांपासुन राज्यातील राजकीय वर्तुळात वेगळे वारे वाहत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गृहमंत्री व भाजपचे सर्वशक्तिमान नेते अमित शहा यांच्याशी गट्टी जमविल्यामुळे त्यांच्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये वितुष्ट आल्याचे, ' समजते आहे. त्याचीच परिणती म्हणजे दसरा मेळाव्याला झालेली शिंदे- शिवसेनेची फजिती होय. सर्व प्रमुख वृत्तपत्र समूह व वृत्तवाहि-यांना भरघोस पॅकेज दिले गेले असतानाही सर्व प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन करताना शिंदेंच्या मेळाव्याची फजिती उडाल्याची वस्तुस्थिती मांडली व दाखवली. (शिंदे यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस गटाने ही बातमी सर्व चॅनेल्समधून प्रसिद्ध होण्याची व्यवस्था केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.) त्यामुळे अलिकडे शिंदे प्रसारमाध्यमांवर काहीसे नाराज असल्याचे दिसते. याच कारणामुळेच सालाबादप्रमाणे मुख्यमंत्र्यांकडे असणारा स्नेहभोजनाचा कार्यक्रम शिंदे यांनी दिवाळी झाल्यानंतर ठेवला असल्याची माहिती 'स्प्राऊट्स'ला मिळालेली आहे.
घातक पायंडा
_________________________________
दिवाळी भेट देणे ही सामान्य गोष्ट आहे. सर्व उदयोगांमध्ये दिवाळी भेट किंवा बोनस हा प्रकार असतोच- परंतु पन्नास हजारांची गिफ्ट व्हॉउचर्स देणे हा निश्चितच घातक पायंडा आहे. थेट लाच देता येत नसल्याने गिफ्ट व्हॉउचर्स देऊन पत्रकारांवर आपला दबाव ठेवणे, हाच उद्देश यामागचा असल्याचे दिसून येत आहे. फडणवीसांनी याबाबत पुढाकार घेतल्यामुळेच त्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.
माध्यमांमध्येही आणली 'खोके' संस्कृती
शिंदे-फडणवीस सरकारच शिवसेनेतील ऐतहासिक बंडानंतर स्थापन झाले आहे. त्याला गुवाहाटीतील 'खोके' संस्कृतीचीही किनार आहे. असे असताना 'खोके-खोके' पुकारुन संबंधित आमदारांना प्रत्येक वेळी जाब विचारणा-या माध्यमवर्गालाच आता खोके संस्कृतीत बाटवण्याची ही सर्व तयारी आहे काय, अशी शंका काही वरिष्ठ पत्रकारांनी ' बोलताना व्यक्त केली.
'लष्कर-ए-देवेंद्र' ची मुख्यमंत्र्यानीच घेतली दहशत
देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याकाळात त्यांचे माध्यमांवर बारीक लक्ष होते. कुठला संपादक किंवा पत्रकार कोणाला भेटला, कोणाचा कुठे संपर्क आहे. याची इत्यंभूत माहिती त्याकाळी फडणवीसांना समजत असे. त्यांची हीच पद्धत आताही सुरु झाल्याची माहिती 'स्प्राऊट्स'च्या हाती आली आहे. या प्रसारमाध्यमांतील 'लष्कर ए देवेंद्र'चा धसका आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र यांनीही यामोबदल्यातच आपल्या मर्जीतील पत्रकारांना ही पन्नास हजार रुपयांची 'दिवाळी' दिलेली आहे.
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
0 Comments