Ticker

6/recent/ticker-posts

दुर्देवी घटना : टिप्परने दिलेल्या धडकेत मायलेकाचा जागीच मृत्यू... नागभिड तालुक्यातील पळसगांव पुलावरील घटना


अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभिड---बुलेट आणि चारचाकीला टिप्परने दिलेल्या धडकेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीर तर मोठा मुलगा किरकोळ जखमी झाला.
ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री 12.30 च्या सुमारास नागभीड ते तळोधी (बा.) मार्गावरील पळसगांव (खुर्द) पुलावर घडली. आई कल्पना रमाकांत कड्यालवार व मुलगा साहिल उर्फ बंटी रमाकांत कड्यालवार (वय 30) असे मृत मायलेकाचे नाव आहे. ते मूळचे नवरगावचे असून सध्या सिंदेवाही येथे राहत होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.20) सिंदेवाही येथील कड्यालवार कुटुंबातील वडील पांडुरंग, आई कल्पना, मोठा मुलगा समीर व लहान मुलगा साहिल असे चौघेजण नागपुला बुलेट गाडी विकत घेण्यासाठी गेले होते. नागपुरात गाडी विकत घेतल्यानंतर ते भिवापूर मार्गे सिंदेवाहीला परत येण्यासाठी निघाले होते.

नागपूरवरुन परत येत असताना साहील हा आपल्या कुटुंबियासमवेत भिवापूर येथे आपल्या सासुरवाडीला थांबला. त्या ठिकाणी जेवण करून सर्व कुटुंबीय अकराच्या सुमारास पुन्हा सिंदेवाही कडे निघाले. चारचाकी वाहनात वडील पांडुरंग व मोठा मुलगा समीर बसले. तर बुलेटवरुन साहिल व आई कल्पना हे दोघे निघाले. दरम्यान, नागभीड ते तळोधी (बा.) मार्गावरील पलसगाव (खुर्द) पुलावर बुलेट रात्री साडेबाराच्या सुमारास बंद पडली. त्यामुळे आई व मुलगा पुलावर थांबले होते.

पाठोपाठ समीर व वडील चारचाकीतून आले. बंद पडलेल्या दुचाकीला पाहत असताना विरुध्द दिशेने तळोधी (बा.) कडून भरधाव आलेल्या टिप्परने दुचाकीसह साहिल व आई कल्पना यांना जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की पुलाचा कटडा तुटून आई व मुलगा पुलाखाली पडले. यामध्ये साहिल व आई कल्पना जागीच ठार झाले. त्यानंतर टीप्परची धडक चारचाकी वाहनाला बसली. त्यामधील वडील पांडुरंग गंभीर तर मोठा मुलगा समीर किरकोळ जखमी झाला.

अपघातानंतर चालक टीप्पर घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी वडील पांडुरंग यांना ब्रम्हपुरीला रुग्णालयात दाखल केले आहे. कड्यालवार कुटुंबिय मूळचे नवरगाव येथील होते. परंतू काही वर्षापासून सिंदेवाही येथे ते स्थायिक झाले आहेत. मृत मुलगा साहिल याचा विवाह भिवापूर येथील मुलीशी ठरलेला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा साक्षगंधही आटोपला होता. येत्या दिवसात विवाह होणार होता. लग्नाची तयारी सुरु झाली होती. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू व दोघे जखमी झाल्याने कड्यालवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments