राजेश खन्ना यांच्या एका निर्णयामुळे अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला एक वेगळंच वळण मिळालं
गेल्या ५ दशकांपासून महानायक अमिताभ बच्चन हे एकाहून एक सरस असे चित्रपट देत आहेत. वयाच्या ८० व्या वर्षीदेखील अमिताभ यांचा उत्साह आणि त्यांची ऊर्जा ही तरुण कलाकारांनाही लाजवणारी आहे. अमिताभ यांच्या फिल्मी कारकिर्दीत सर्वात मोठा वाटा आहे तो म्हणजे यश चोप्रा यांचा. यश चोप्रा यांच्या ‘दीवार’ या चित्रपटाची चर्चा आजही होते. या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांना रातोरात सुपरस्टार बनवलं. पण या चित्रपटासाठी पहिली पसंत अमिताभ बच्चन नव्हते.
आजही बऱ्याच लोकांना या चित्रपटामागची ही गोष्ट ठाऊक नाही. मीडिया रीपोर्टनुसार ‘दीवार’मध्ये विजय वर्मा हे पात्र साकारण्यासाठी यश चोप्रा यांनी राजेश खन्ना यांची निवड केली होती. आधी ‘दाग’ चित्रपटात यश चोप्रा यांनी राजेश खन्नासह काम केल्याने त्यांच्या डोक्यात ही गोष्ट पक्की होती. त्याकाळी राजेश खन्ना यांची लोकप्रियता प्रचंड होती, असं म्हंटलं जायचं की त्याकाळी राजेश खन्ना यांच्याकडे दिग्दर्शकांच्या रांगा लगायच्या.
या कारणामुळेच त्यांना ‘दीवार’साठी वेळ काढणं शक्य नसल्याने त्यांनी हा चित्रपट सोडला. त्यानंतर लेखक सलीम-जावेद यांनी यश चोप्रा यांना अमिताभ बच्चन हे नाव सुचवले. यश चोप्रा यांनीही अमिताभ यांना संधी दिली अन् पुढे जो इतिहास रचला गेला तो सर्वश्रुत आहेच.
राजेश खन्ना यांच्या एका निर्णयामुळे अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला एक वेगळंच वळण मिळालं. ‘दीवार’ हा चित्रपट चांगलाच गाजला. यातील डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंडावर आहेत. या चित्रपटात अमिताभ यांच्यासह शशी कपूर, नितू सिंग, परवीन बाबी, निरुपा रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या, पण या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांच्यासारखा सुपरस्टार उदयास आला ही यातील सर्वात महत्वाची गोष्ट.
साभार - लोकसत्ता
0 Comments