मूल : मुल, गुंडपिपरी, पोंभुर्णा, सावली इत्यादी तालुक्यांमध्ये जनावरांना कत्तलखान्यात नेणारी टोळी सक्रिय असून अनेक ठिकाणातून चोरट्या मार्गाने बैलांची कत्तलखान्यात तस्करी केली जात आहे.वाहनांमध्ये जनावरे कोंबून नेत असताना मूल पोलिसांनी शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान पकडून त्यांच्यावर कारवाई केली. या वाहनातील सहा जनावरांना मुक्त करण्यात आले.
कारवाईनंतर वाहनचालक वाहन तिथेच सोडून फरार झाला. फरार वाहन चालकाविरुद्ध विविध कलमान्वये मूल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मागील काही महिन्यांपासून मूल तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी केली जात आहे. दरम्यान सावली-मूल मार्गावरून बोलेरो पिकअप चारचाकी वाहनातून जनावरांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मूल पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे रेल्वे क्रॉसिंगजवळ पोलिसांनी सापळा रचून मूलवरून चंद्रपूरकडे जात असलेल्या बोलेरो पीकअप वाहनाला (क्रमांक एम.एच. ३४ ए. बी. ८८३५)
थांबवून तपासणी केली असता वाहनांमध्ये सहा जनावरे आढळून आली. यादरम्यान वाहनचालक वाहन सोडून फरार झाला.
जनावरांना लोहारा येथील श्री. उज्ज्वल गौरक्षण संस्थेमध्ये पाठविण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली राधेश्याम यादव, उत्तम कुमरे, सचिन करीत आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading