चंद्रपूर : शहरातील नामवंत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांनी आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. आपल्या क्लिनिकमध्येच त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हेवी डोसचे इंजेक्शन घेऊन डॉक्टरांनी जीवनयात्रा संपवली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. अग्रवालांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चंद्रपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात डॉ. उमेश अग्रवाल हे मोठे नाव आहे. ४८ वर्षीय अग्रवाल हे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ आहेत. शहरातील मुख्य मार्गावरील चर्च समोर डॉ. उमेश अग्रवाल यांचा नेत्र तपासणीचे क्लिनिक आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास क्लिनिक मधील रेस्टरूम मध्ये डॉ. उमेश अग्रवाल यांनी हेवी डोसचे इंजेक्शन घेतले होते. डॉ.अग्रवाल यांनी इंजेक्शन घेतल्याची बाब ज्यावेळी उघडकीस आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये रुग्ण आला म्हणून परिचर त्यांना बोलावण्यासाठी घरी गेला होता. यावेळी डॉ. अग्रवाल त्यांच्या बेडरूममध्ये पलंगावर झोपलेल्या अवस्थेत दिसले. परिचराने डॉ. अग्रवाल यांना आवाज दिला. परंतु ते उठले नाही. यावेळी त्यांच्या जवळ जाऊन पाहिले असता त्यांचा श्वास बंद झाल्याचे त्याच्या लक्षात आले. घाबरलेल्या परिचराने आरडाओरड केली.
डॉ. अग्रवाल यांचे बेडशेजारी इंजेक्शन पडून होते. ते इंजेक्शन घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच IMA चे पदाधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. डॉ. उमेश अग्रवाल यांची पत्नी सुद्धा डॉक्टर आहे. उमेश यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असून घटनेच्या वेळी ते शहराबाहेर असल्याची माहिती आहे.
डॉ. अग्रवाल यांच्या आत्मह त्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
0 टिप्पण्या
Thanks for reading