महाराष्ट्रातील जनता वाऱ्यावर! गंभीर पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्री दिल्लीत
मुंबई: महाराष्ट्रातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा प्रसंगी पूर्वग्रस्त भागातील जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठली.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून समर्थकांकडून सुरू असलेली बॅनरबाजी त्यातच राज्यात लवकरच अजित पर्वाची सुरुवात होणार असल्याचे करण्यात आलेले सुचक ट्विट, यामुळे राज्यात नेतृत्व बदलाची आणि अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यातील पूर परिस्थिती आणि राज्य मंत्रिमंडळातील सहकारी असणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस काढून मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी दिल्ली दरबारी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायंकाळी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधील आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत.
त्यातच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून अजित पवार समर्थकांकडून वातावरण निर्मिती केली जात आहे. यामुळे राजकीय संभ्रम निर्माण झालेला असतानाच शिंदे यांनी सहकुटुंब मोदी आणि शहा यांची भेट घेतल्याने शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी ही सदिच्छा भेट होती असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
0 Comments