दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
मुंबई:राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी राज्यमंत्री डॉ. परिणम फुके यांनी यासाठी भक्कम पाठपुरावा केला होता. त्यानुसार मंत्रिमंडळाने अखेर मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पोलिस पाटलांना 6 हजार 500 रुपये मानधन देण्यात येत होते. आता त्यात वाढ करून हे मानधन 15 हजार रुपये दरमहा करण्यात आले आहे.
गोंदियातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाने यासाठी लढा सुरू केला होता. राज्यभरात सुरू असलेल्या या लढ्याची दखल घेत माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात सरकारशी चर्चा करणार असल्याची ग्वाही पोलिस पाटलांना दिली होती. त्यानुसार सरकारी पातळीवर निर्णय झाल्याने आता आनंद व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडेच गोंदिया येथे पोलिस पाटलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा, मेळावा व ज्येष्ठ सेवानिवृत्त पोलिस पाटलांचा सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी पोलिस पाटलांना मानधान वाढीबाबतचे वचन दिले होते.
डॉ. परिणय फुके यांनी या वेळी पोलिस पाटील भवनाच्या उभारणीसाठी व गोंदिया व भंडारा जिल्ह्यांतील पोलिस पाटलांच्या संघटनेला प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करून घेऊ असे सांगितले होते. कार्यक्रम संपल्यांनतर लगेचच डॉ. फुके यांनी गोंदिया ते लाखनी येथे प्रवास करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पोलिस पाटलांच्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली. चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मानधन वाढीची ग्वाही दिली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. परिणय फुके यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पोलिस पाटलांचे मानधन 6 हजार 500 रुपयांवरून 15 हजार रुपये करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार बुधवार, (ता. 13) मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिस पाटलांच्या बैठकीत मानधनात 8 हजार 500 रुपयांनी वाढ करण्यात आली. आता पोलिस पाटलांना 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे.
नुकसानभरपाईपासून लोक होते वंचित, डॉ. फुकेंनी असा खेचून आणला निधी!
2019 पूर्वी पोलिस पाटलांच्या मानधन केवळ 3 हजार रुपये होते. 2019 मध्ये पोलिस पाटील संघटनेने गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. फुके यांनी तेव्हाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यावेळी फडणवीस सरकारने पोलिस पाटलांचे मानधन 3 हजार रुपयांवरून 6 हजार 500 रुपये केले होते. आता पुन्हा एकदा फुके यांच्यामुळे पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ झाली आहे. पोलिस पाटलांच्या मानधनात पुन्हा दुपटीने वाढ करण्यासाठी परिणय फुके यांनी मोठी भूमिका निभावल्याने राज्यभरातील पोलिस पाटलांनी आनंद व्यक्त केला आहे.
0 Comments