*नगर पंचायचा कारभार नियोजन शून्य*-पाच दिवसापासून पाणी पुरवठा बंद
-दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरू करा अन्यथा घागर आंदोलन करू- विरोधी पक्षनेता आशिष कावटवार यांचा इशारा
पोंभूर्णा - पोंभूर्णा नगर पंचायतमधे भाजपची एकहात्ती सत्ता असून प्रशासनावर पदाधिकाऱ्याचा वचक नसल्याने ढिसाळ व अनियंत्रित कारभारामुळे शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला असल्यामुळे नागरिकांना पाच दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणार्या घाटकुळ येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी खाली गेल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या विहिरीवर बसविण्यात आलेले जाॅगवेल वरती असल्यामुळे पाणी पुरवठा बंद झाला आहे. विहीरीमधे अनेक वर्षांपासून गाळ (माती) जमा झाल्याने व ती गाळ उपसा करण्यात न आल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमधील मोटारी बंद पडल्या आहेत. तर शहरा लगत असलेल्या अंधारी नदीवर नगर पंचायतच्या दुर्लक्षितामुळे मोटार व पॅनल बोर्ड नादुरस्त आहे.शिवाय शहरातील नाल्यावरील मोटारी गायब झाल्या आहेत. शहरातील पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे ‘नदी उशाला अन् कोरड घशाला’ अशी गत शहरवासियांची झाली आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपची नगर पंचायतमद्ये एक हाती सत्ता आहे.सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे नियोजन हे शून्य असून सक्रिय पणे पाणी टंचाई वर मात करण्यासाठी अपयशी ठरत आहे.नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकडे नगर पंचायतने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.नगरपंचायत भ्रष्टाचाराचे कुरणे असल्याने अनेक कामात भ्रष्टाचार सुरू आहे.अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याने नगर पंचायत वाऱ्यावर आहे.त्यामुळे शहरवासीयांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज ना पदाधिकाऱ्याला आहे ना अधिकाऱ्यांना आहे असा आरोप विरोधी पक्षनेता आशिष कावटवार यांनी केला आहे.
पोंभूर्णा शहराचा पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीटंचाईचे माहेर घर म्हणून देखील या शहराला ओळखले जाते. पाण्यासाठी होणारी अबालवृध्दांची धडपड असे विदारक चित्र गेल्या अनेक वर्षापासून येथे पहावयास मिळत आहे.या वर्षी पाऊस चागल्या प्रमाणात पडल्यामुळे पाणी साठा मुबलक असल्याने यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही अशी जनतेस आशा होती. मात्र नगरपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाच दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.शहरातील पाणी पुरवठा ठप्प असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
--------
येत्या दोन दिवसात पोंभूर्णा शहरातील पाणी पुरवठा सुरू न झाल्यास गावकऱ्यांना घेऊन नगरपंचायत समोर घागर फोडो आंदोलन सुरू करू.
-आशिष कावटवार, विरोधीपक्षनेते नगरपंचायत पोंभूर्णा
0 टिप्पण्या
Thanks for reading