महावितरणच्या वीज बिल थकबाकीचा डोंगर ८७ हजार कोटींवर पोहोचला आहे. त्यामध्ये महिन्याला ४०० ते ५०० कोटी रुपयांची भर पडत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरणने थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली आहे.
त्यानुसार कृषिपंप वगळता सुमारे १३ हजार ४३३ कोटी रुपयांची थकबाकी मार्चमध्ये वसूल केली जाणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांचे वीज बिल थकल्यास वीज कापण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे.
महावितरणची कृषिपंपधारक आणि कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना वगळून सुमारे ८३ लाख घरगुती आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांकडे १३ हजार कोटी रुपयांहून अधिकची थकबाकी आहे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ होऊ नये, मार्चअखेर जास्तीत जास्त थकीत रक्कम वसूल करण्याचे निर्देश विभागीय कार्यालयांना दिले आहेत. तसेच एखाद्या वीज ग्राहकाची दोन वीज बिलांची थकबाकी राहिल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिले असल्याचे महावितरणच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
0 Comments