मृतक गडचिरोली जिल्ह्यातील, कुटुंबाचा आधार हरपला
जुनगाव: येथून दक्षिण दिशेला काही अंतरावर असलेल्या घाटकुळ येथील वैनगंगा नदीत मच्छी मारण्याकरिता गेलेल्या मच्छीमाराचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी रविवारी आठच्या सुमारास उघडकीस आली. शालिक मंडल वय वर्षे चाळीस, राहणार दुर्गापूर,तालुका चामोर्शी असे बुडून मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील दुर्गापुर येथील सात ते आठ मच्छिमार बांधव घाटकुळ येथील वैनगंगा नदी पात्रात उतरले. मात्र यातील एक जण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडाला. घटनेची माहिती गावात होताच नदीकडे लोकांनी धाव घेतली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर गोंडपिपरी पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली. अथक प्रयत्नानंतर दुपारी तीन वाजता मृतदेह हाती लागला.
पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता गोंडपिपरी येथे पाठवण्यात आला. या घटनेमुळे कुटुंब उघड्यावर आले असून कुटुंबाचा आधारवड हरपला अशी दुर्गापुर या गावात चर्चा होती.
0 टिप्पण्या
Thanks for reading