गोवर्धन येथे घरावर झाड कोसळून लाखाचे नुकसान
चंद्रपूर : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. याशिवाय वादळी वाऱ्यामुळे झाडेही उन्मळून पडत असल्याने घरांसह वीजतारा तुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे.आज सकाळी नऊ वाजताची सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे मुल तालुक्यातील गोवर्धन येथे घरावर चिंचेचे मोठे झाड कोसळून सुमारे एक लाखांचे नुकसान झालेले आहे.
मुल, पोंभुर्णा तालुक्यात दोन दिवसापासून काही ठिकाणी सतत पावसाच्या धारा बरसत आहेत. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचा आकडा दररोज वाढत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव येथील आदिवासी शेतमजूर भास्कर गेडाम यांच्या घर वजा झोपडीत पाणी शिरले.तेथिलच विधवा महिला शिला झबाडे यांच्याही घरात पावसाचे पाणी शिरले. अत्यंत गरिब आदिवासी लाभार्थी असूनही आजपर्यंत यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. या उलट ज्यांना पक्के घर राहायला आहे, अशा लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे.
त्यामुळे गरजू वंचित राहून दरवर्षी पावसाळ्यात मरण यातना भोगून जीवन जगतात.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 9 वाजता सुरेश विठोबा उमक राहणार गोवर्धन यांच्या गुरांच्या घरावर मोठे झाड कोसळले.यात घराचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून १ संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून गरजू लाभार्थ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य काजुल लाकडे व माजी सरपंच उमक यांनी केली आहे.
0 Comments