लाखोंचा खर्च पाण्यात:देखभाल, दुरुस्तीअभावी जल शुद्धीकरण संयंत्र पडताहेत बंद; बहुतांश ठिकाणचे ‘वॉटर एटीएम’ बनले शोभेची वस्तू
जिवनदास गेडाम (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर:पोंभुर्णा तालुक्यात लाखो रुपयांचा निधी खर्चून जल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहे. ग्रामीण जनतेला पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, या उद्देशाने गावा-गावात जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहेत.
५ रुपयात २० लिटर शुद्ध पाणी वॉटर एटीएम च्या माध्यमातून नागरिकांना पुरविण्यात येत आहे. मात्र अवघ्या काही हे जलशुद्धीकरण संयंत्र नादुरुस्त होत आहेत.नव्हे लावले तेव्हापासूनच अनेक ठिकाणचे संयंत्र बंद आहेत. त्यामुळे त्याचा नागरिकांना कुठलाही फायदा होताना दिसत नाही.
दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांपासून नागरिकांचा बचाव व्हावा, व त्यांचे आरोग्य निरोगी रहावे याकरिता ५ रुपयात २० लिटर शुद्ध व स्वच्छ पाणी नागरिकांना मिळण्यासाठी वॉटर एटीएम बसविण्यात आले. ५ रुपयात शुद्ध पाणी मिळू लागल्याने नागरिकांची पावले वॉटर एटीएमकडे वळू लागली. वॉटर एटीएमला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळू लागला. दूषित पाणी पिण्यामुळे होणारे आजार लक्षात घेता सामान्य जनताही वॉटर एटीएमच्याच पाण्याचा पिण्याकरिता वापर करू लागली. जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला. असे असतांनाच जलशुद्धीकरण यंत्र मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होऊ लागली आहे.
वॉटर एटीएम नागरिकांना शुद्ध पाण्याची पूर्तता करण्यास असमर्थ ठरू लागले आहेत.
तालुक्यातील काही वॉटर एटीएम तांत्रिक दुरुस्ती अभावी बंद पडले आहेत. काही वॉटर एटीएम तर बसवली तेंव्हा पासूनच बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला जल शुद्धीकरण प्रकल्प उभारल्यानंतरही शुद्ध जल मिळण्याकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे. वॉटर एटीएमच्या दुरुस्ती व देखभाली करिता निधीची तरतूद असतानाही वॉटर एटीएमच्या दुरुस्ती व देखभालीकडे जराही लक्ष दिले जात नाही.त्यामुळे आता काही ठिकाणचे जलशुद्धीकरण यंत्र केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. जलशुद्धीकरण यंत्र उभारण्याकरिता आलेल्या निधीचा विल्हेवाट लावल्यानंतर वॉटर एटीएमकडे नंतर लक्षही दिले जात नसल्याचे पहायला मिळत आहे. वॉटर एटीएम बसविण्याला नेमका खर्च किती आला, व खर्च दाखविला किती, हा गुंता देखील अद्याप सुटलेला नाही. वॉटर एटीएम बसविण्याकरिता ग्रामपंचायतेला विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला. वॉटर एटीएमच्या दुरुस्ती व देखभाली करिताही निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु तरीही वॉटर एटीएमच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने काही ठिकाणचे वॉटर एटीएम अनेक दिवसांपासून बंद पडले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading