Advertisement

पोंभुर्णा तालुक्यातील "ते" वसुली बाज पत्रकार कोण? तालुका पत्रकार संघाच्या नावावर रेती माफियांकडून वसुलीचा आरोप; पत्रकार संघातील प्रामाणिक पत्रकारांत संताप..

पोंभुर्णा तालुक्यातील "ते" वसुली बाज पत्रकार कोण?


तालुका पत्रकार संघाच्या नावावर रेती माफियांकडून वसुलीचा आरोप; पत्रकार संघातील प्रामाणिक पत्रकारांत संताप..

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क..
तालुका प्रतिनिधी, [पोंभुर्णा]

तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध गौण खनिजाचे (रेती, मुरूम इत्यादी) उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रशासनाचे लक्ष चुकवून, हे अवैध उत्खनन चैतन्याने सुरू असतानाच त्याची माहिती माध्यमांमधून बाहेर येऊ नये यासाठी काही पत्रकारांकडून कथितपणे रेती माफियांकडून वसुली होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या वसुलीसाठी तालुका पत्रकार संघाच्या नावाचा गैरवापर होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. संघात नोंद असलेल्या एकूण १४ पत्रकारांच्या नावाचा उल्लेख करत काही मोजक्या व्यक्तींनी एकमुखीपणे पैसे उकळल्याचे आरोप होत आहेत. मात्र, वसूल झालेली रक्कम संघातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे अनेक पत्रकारांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकारामुळे पत्रकार संघातील प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ पत्रकारांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागत आहे. “तालुक्यात अवैध गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. त्या बातम्या लपवण्यासाठी रेती तस्करांकडून पत्रकार संघाच्या नावावर वसुली केली जात आहे. आणि इतर पत्रकारांना याची कल्पना सुद्धा लागू दिली जात नाही, ही बाब अत्यंत खेदजनक असून दुर्दैवी आहे. अशा पत्रकारांमुळे संपूर्ण पत्रकार समाजाची प्रतिमा मलीन होत आहे. परंतु या पत्रकारांवर कारवाई करणार कोण?” असा प्रश्न तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जीवनदास गेडाम यांनी उपस्थित केला आहे.

तालुका पत्रकार संघात पुण्यनगरीचे नीलकंठ ठाकरे, दैनिक सुवर्ण महाराष्ट्र चे रुपेश निमसरकार, लोकमतचे सुरेश कोमावार, देशोन्नती चे विजय वासेकर, सकाळ चे आशिष कावटवार, नवभारत चे इक्बाल कुरेशी, नवराष्ट्र चे भुजंग ढोले,  लोकमत चे विकास शेडमाके यांच्यासह इतर पत्रकारांचा समावेश आहे. संघाचे अध्यक्ष सुरज गोरंतवार आहेत.

सद्या सुरु असलेल्या वसुली प्रकरणामुळे संघाच्या प्रतिष्ठेला तडा गेला असून, या संदर्भात सखोल चौकशी होऊन दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रामाणिक पत्रकारांकडून करण्यात येत आहे. अन्यथा, या संघटनेपासून स्वतःला वेगळे करण्याचा विचार काही पत्रकार करत असल्याचेही समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या