विजय जाधव, प्रतिनिधी
नांदगाव, ४ मे:
नांदगाव सह परिसरातील नागरिक गेल्या पाच दिवसांपासून सतत वीज पुरवठ्याच्या अडचणींमुळे हैराण झाले आहेत. दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असून, अनेकदा रात्रीच्या वेळेसही वीज बंद राहत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वीज पुरवठ्यातील या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वेळापत्रक बिघडले आहे, व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत आणि सामान्य जनतेला घरगुती कामकाजातही अडचणींचा सामना करावा लागत आहे. वृद्ध आणि आजारी व्यक्तींनाही या समस्येचा फटका बसत असून, उष्णतेच्या कडाक्यामुळे त्यांचे हाल होत आहेत.
नांदगाव आणि आसपासच्या गावांमध्ये वीज खात्याच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. काही भागांमध्ये तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत आहे. या वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेबद्दल वीज वितरण कंपनीकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, काही तांत्रिक दुरुस्त्या सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र नागरिकांनी हे कारण स्वीकारण्यास नकार दिला असून, वारंवार वीज खंडित होणे हे दुर्लक्ष व अपयशाचे लक्षण असल्याचे मत व्यक्त केले.
"दररोज वीज येते आणि जाते. रात्रीसुद्धा लाईट नसते. एवढ्या उन्हात मुलं-बाळं झोपू शकत नाहीत," अशी प्रतिक्रिया एका स्थानिक रहिवाशाने दिली.
नागरिकांनी लवकरात लवकर स्थायी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
---
0 टिप्पण्या
Thanks for reading