पोंभूर्णा शहरातील 'तो' खड्डा ठरत आहे जीवघेणा – प्रभाग क्र.१२ मध्ये ठेकेदाराची मनमानी, नागरिक संतप्त
पोंभूर्णा: शहराच्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये नवीन पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेला १० फूट खोल खड्डा गेल्या एक महिन्यापासून तसाच खुला आहे. सदर खड्ड्याचे काम अपूर्ण असून ठेकेदारांकडून याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शहरात पाणीप्रश्न सुटावा यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सर्व वॉर्डांमध्ये नव्या पाईपलाइनचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदारांकडून केवळ खोदकाम करून तसेचच अर्धवट काम सोडले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रभाग क्र.१२ मध्ये पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा याचे जिवंत उदाहरण आहे.
हा खड्डा अपघाताला आमंत्रण देणारा ठरत असून त्याच्या आजूबाजूला अंगणवाडी असल्याने लहान मुले येथे सतत खेळत असतात. त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही कुठलीही कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त केला आहे.
"या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. गाड्यांची ये-जा आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा जीवघेणा खड्डा त्वरित बुजवण्यात यावा."
– सागर बिरादर, प्रभाग क्र.१२ चे रहिवासी
एकीकडे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलत असून विकासकामे झपाट्याने सुरू आहेत. मात्र दुसरीकडे ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हेच काम नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. नागरिकांनी संबंधित खड्डा त्वरित बुजवण्याची आणि कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading