रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप : देवाडा (बु.) येथील रोजगार सेवकाला निलंबित करण्याची गावकऱ्यांची मागणी..
ब्युरो रिपोर्ट दरारा 24 तास न्यूज नेटवर्क..
पोंभूर्णा (प्रतिनिधी) – देवाडा (बु.) येथील रोजगार सेवक विकास मेश्राम यांच्यावर रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये गंभीर अनियमितता व भ्रष्टाचाराचे आरोप होत असून, त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दिनांक १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पोंभूर्णा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत गावकऱ्यांनी ही माहिती दिली.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रोजगार सेवक मेश्राम हे आपल्या पदाचा गैरवापर करत असून, गरजू कामगारांकडून जॉब कार्ड बनविण्याच्या नावाखाली प्रत्येकी ५०० रुपये उकळले जात आहेत. याशिवाय, रोजगार हमी योजनेतील कामांचे पैसे खात्यात जमा करून देण्यासाठीही लाभार्थ्यांकडून लाच मागितल्याचे आरोप आहेत. अनेकवेळा मजुरांना काम न देणे, त्यांना कामावरून हटवणे किंवा हुज्जत घालणे असे प्रकार सर्रास घडत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
गावातील बेरोजगार तरुणांना हेतुपुरस्सर कामांपासून वंचित ठेवले जात असून, त्यांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. तसेच, रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामासाठी व म्हैस गोठा योजनेतील निधी मिळवून देण्यासाठीही संबंधित लाभार्थ्यांकडून पैसे मागितल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत गावातील नागरिकांनी एकत्र येत लेखी तक्रार प्रशासनाकडे सादर केली असून, दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला अतुल चुधरी, सुरेश झाडे, गिरिधर बदन, प्रदीप भिवनकर, दिनेश बदन, रितीक भिवनकर, किशोर तिवाडे, साईनाथ बदन, चूडामणी बदन, गंगाधर घोडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकरणावर गटविकास अधिकारी विवेक बेल्लारवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “देवाडा (बु.) येथील रोजगार सेवकाबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.”
0 टिप्पण्या
Thanks for reading