Advertisement

चंद्रपूरच्या सावली तालुक्यात खळबळजनक हत्या: किरकोळ वादाचे हिंसक रूप, तरुणाची चाकूने निर्घृण हत्या..

चंद्रपूरच्या सावली तालुक्यात खळबळजनक हत्या: किरकोळ वादाचे हिंसक रूप, तरुणाची चाकूने निर्घृण हत्या..


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क..
सावली (जिल्हा चंद्रपूर) – सावली तालुक्यातील केरोडा (मानकापूर) हेटी गावात मंगळवारी रात्री किरकोळ वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन एक तरुण जीव गमावण्याची दुर्दैवी घटना घडली. आंबेडकर चौकात झालेल्या या वादात ३२ वर्षीय समीर हरिदास खंदारे याची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री सुमारे ९:३० वाजता घडली.

मृत समीर खंदारे हा केरोडा (मानकापूर) हेटी येथील रहिवासी असून मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी सायंकाळी सुमारे ७:३० च्या सुमारास समीर याचा आंबेडकर चौकातील रामदास कन्नाके यांच्या दुकानाजवळ गिरधर वालदे (५०) व त्याचा मुलगा अभय वालदे (२३) यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता.

या वादानंतर दोन तासांनी, रात्री साडेनऊच्या सुमारास, अमित शेट्टी या युवकाने समीरच्या मोठ्या भावाला फोन करून सांगितले की, "तुमचा भाऊ आंबेडकर चौकात मृतावस्थेत पडला आहे." घटनास्थळी पोहोचले असता, समीर रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या उजव्या मांडीवर चाकूचे गंभीर वार झाले होते.

घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात, वादानंतर आरोपींनी दुचाकीने व्याहाड गावात जाऊन दोन अल्पवयीन गुन्हेगारांना बोलावल्याची माहिती समोर आली. या चौघांनी मिळून समीरवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा जागीच मृत्यू केला.

हल्ल्यानंतर समीरचा मृतदेह नितेश नैताम यांच्या पानठेल्यासमोर टाकण्यात आला व आरोपी दुचाकीवरून फरार झाले. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी गिरधर वालदे, अभय वालदे तसेच दोघा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या