दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | गडचिरोली
वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी अवैध मुरुम उत्खनन; तहसीलदारांच्या निलंबनाची माजी सरपंचाची मागणी
गडचिरोली – वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामासाठी JP इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून महसूल विभागाच्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर गौण खनिज म्हणजेच मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू आहे. याप्रकरणी खांबाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकिशोर शेडमाके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, गडचिरोलीचे तहसीलदार संतोष आष्टीकर, पोर्ला मंडळाचे मंडळ अधिकारी गोरेवार आणि तलाठ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
शेडमाके यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांची भेट घेऊन, उत्खनन स्थळांचे फोटोसह पुरावे सादर केले. त्यात पोर्ला, वसा आणि वसा चक या गावांतील महसूल जमिनीतून JP इन्फ्रास्ट्रक्चरकडून रोज हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उत्खननासाठी कंपनीकडे कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचेही त्यांनी सांगितले.
तलावांचे नुकसान, जैवविविधतेला धोका
पोर्ला मंडळात लाखो ब्रास मुरुमाचे उत्खनन होऊन सहा मोठे खड्डे पडले आहेत. चुरमुरा आणि किटाळी येथील तलावांमधूनही माती व मुरुमाची अवैध वाहतूक झाली आहे. यामुळे जलस्रोत नष्ट होत असून, जैवविविधतेवर गंभीर परिणाम झाला आहे. अलीकडेच किटाळी येथील लोभा मंगरे या महिलेला खड्ड्यात बुडून आपला जीव गमवावा लागला. तसेच वाघ, हरीण यांसारख्या वन्य प्राण्यांचाही धोका वाढला आहे.
पूर्वी २३५ कोटींचा दंड, तरीही उत्खनन सुरूच
गेल्या वर्षी जिल्हाधिकारी राहुल भाकरे यांनी नेमलेल्या चौकशी समितीने याच कंपनीच्या अवैध उत्खननाचे पुरावे मिळवल्यानंतर २३५ कोटींचा दंड ठोठावला होता. मात्र, आजतागायत तो दंड शासनाकडे जमा झालेला नाही. तरीही कंपनीचे उत्खनन थांबलेले नाही, ही बाब चिंताजनक असल्याचे शेडमाके यांनी म्हटले आहे.
दोषींवर कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा
“तत्काल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. जोपर्यंत मागील दंड वसूल होत नाही, तोपर्यंत कंपनीला परवानगी देऊ नये. अन्यथा २६ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनांच्या माध्यमातून बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रशासनाकडून गांभीर्याने दखल
या प्रकरणी प्रतिक्रिया देताना निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी, "प्रकरण अतिशय गंभीर असून, लवकरच चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल," असे आश्वासन दिले.
0 टिप्पण्या
Thanks for reading