तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल) येथे शनिवारी सकाळी घटना
चंद्रपूर, दि. ११ मे (प्रतिनिधी): सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल) येथील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला करून तीन महिलांचा जागीच बळी घेतला. या दुर्दैवी घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत महिलांची नावे शुभांगी मनोज चौधरी (३८), कांताबाई बुधा चौधरी (६०) आणि रेखा शालिक शेंडे (४८) अशी आहेत. जखमी महिलेला वंदना विनायक गजभिये (५०) असे नाव असून, ती सध्या उपचाराखाली आहे. विशेष म्हणजे मृतांपैकी शुभांगी व कांताबाई या सासू-सुना होत.
तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. दररोज शेकडो महिला आणि पुरुष जंगलात जातात. शनिवारी सकाळी ही चारही महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. यात तिघींचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. मात्र, सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. तेंदूपत्ता संकलनाच्या काळात अशा घटना वारंवार घडत असल्याने वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading