पोंभुर्णा तालुक्यात वारंवार वीज खंडित; जनतेमध्ये तीव्र असंतोष
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शिक्षण, शेती, वैद्यकीय सेवा, उद्योगधंदे आणि दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत असून ही परिस्थिती आता असह्य झाली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यप्रणालीवर जोरदार टीका केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत त्यांनी वीज वितरण यंत्रणेत तातडीने सुधारणा न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात मुनगंटीवार म्हणाले, "वीज वितरण यंत्रणेतील नियोजनशून्यता व उदासीनतेमुळे जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे शाळा-महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया, शेतकऱ्यांचे शेती कामकाज आणि लघुउद्योजकांचे आर्थिक व्यवहार यांवर गंभीर परिणाम होत आहे. ट्रान्सफॉर्मर वेळेवर बदलले जात नाहीत, दुरुस्तीला विलंब होतो, परिणामी एकदा वीज गेली की ती पुन्हा येण्यास तासन्तास लागतात."
तक्रारींचा पाढा मांडत मुनगंटीवार यांनी प्रशासनावर सवाल उपस्थित करत पुढे सांगितले, "जर यंत्रणेत तात्काळ सुधारणा न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वीज वितरण कंपनीविरोधात जनआंदोलन उभारले जाईल. प्रशासनाने जनतेच्या भावना ओळखून तत्काळ कृती करावी व सुधारणा प्रक्रिया सुरू करावी, हीच अपेक्षा आहे."
0 टिप्पण्या
Thanks for reading