Advertisement

चार बैलांपैकी दोन बैल चोरीला गेले – शेतकरी प्रमोद मांडवगडे यांची तक्रार



जुनगाव, ता. मूल, जि. चंद्रपूर | 17 जून 2025

जुनगाव येथील शेतकरी प्रमोद मांडवगडे यांनी आपल्या दोन बैलांच्या चोरीबाबत पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 29 मे 2025 रोजी रात्री 9.30 ते 30 मे 2025 सकाळी 7 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन बैल गोठ्यातून चोरून नेले.

प्रमोद मांडवगडे हे आपल्या कुटुंबासह जुनगाव येथे वास्तव्यास असून शेती व्यवसाय करतात. त्यांच्याकडे आणि त्यांच्या भावाकडे एकूण चार बैल होते. हे बैल शेतीच्या कामासाठी वापरले जात होते. दररोजप्रमाणे 29 मे रोजी सायंकाळी चारही बैल गोठ्यात बांधण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी गोठ्यात पाहणी केली असता त्यांचे स्वतःचे दोन बैल बेपत्ता आढळून आले.

शोधाशोध केल्यानंतरही बैलांचा पत्ता न लागल्यामुळे आज त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. चोरी गेलेल्या दोन्ही बैलांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे – वय 5 वर्ष, रंग पांढरा, एका बैलाचे डाव्या बाजूचे शिंग वाकलेले, दुसरा बैल सिंगरा, एका बैलाची कानोरी पांढरी आणि दुसऱ्याची गुलाबी. दोन्ही बैलांना बेसन लावलेले आहे. चोरी गेलेल्या बैलांची एकूण अंदाजे किंमत ₹70,000/- असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

शेतकऱ्याचे म्हणणे आहे की, त्यांनी आजूबाजूच्या गावांमध्ये आणि शेतशिवारात बैलांचा शोध घेतला, परंतु कुठेही त्यांचा थांगपत्ता लागला नाही.

शेतकऱ्याच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलीस प्रशासनाने तात्काळ तपास सुरू करावा, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागात बैल हे शेतकऱ्याच्या शेतीचे मुख्य आधार असतात आणि अशा घटना त्यांच्यावर आर्थिक व मानसिक दडपण आणणाऱ्या असतात.


📰 वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क
तारीख – 20 जून 2025

तुमच्या परिसरात घडणाऱ्या अशाच घटना, तक्रारी किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा – वैनगंगा न्यूज लाईव्ह तुमच्या आवाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत राहील.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या