दरारा २४ तास | चंद्रपूर
विवाह म्हणजे फक्त दोन व्यक्तींमधील नवजीवनाचा प्रारंभ नसून, तो सामाजिक जाणीवेचाही एक हृदयस्पर्शी आविष्कार असू शकतो, याचा आदर्श उदाहरण चंद्रपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विवाह सोहळ्याने साऱ्या समाजासमोर ठेवला आहे.
दिव्यांग कल्याणासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे निलेश पाझारे व पुष्पा सावसागडे यांचा विवाह स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात अत्यंत साधेपणाने व नोंदणी पद्धतीने पार पडला. पारंपरिक खर्चिक विधींना फाटा देत या विवाह सोहळ्याला सामाजिक उपक्रमांची प्रभावी जोड देण्यात आली.
या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात वधू-वरांनी शुभमुहूर्तावर दिव्यांग बांधवांसाठी उपयोगी ठरणारी मदत साहित्य वाटपाची उल्लेखनीय जबाबदारी स्वीकारली. यामध्ये स्वयंचलित व्हीलचेअर, अंध व्यक्तींना उपयोगी स्मार्ट काठी, श्रवणयंत्र, कुबड्या यांसह विविध सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग विभागासाठी एक व्हीलचेअरही भेट देण्यात आले.
याचवेळी उपस्थित नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्याचा उपक्रमही राबविण्यात आला. या सत्रात समाजसेवा अधीक्षक भास्कर झळके आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभळकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजना, कौशल्य विकास प्रकल्प यांची सविस्तर माहिती दिली.
निलेश पाझारे हे स्वतः दिव्यांग असून, दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग कल्याण क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य केले आहे. सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणारे असंख्य युवा समाजात निर्माण झाले आहेत.
सदर विवाह सोहळा हा समाजासाठी एक प्रेरणादायी घटना ठरली असून, सर्वत्र या विवाहीत जोडप्याचे कौतुक होत आहे. चंद्रपूरमधील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास हजेरी लावून आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
हा विवाह केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याचा नव्याने प्रारंभ नसून, तो सामाजिक संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचा एक उजळवणारा दीपस्तंभ ठरला आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading