प्रतिनिधी | दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | सातारा
सातारा जिल्ह्यातील एका गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका 23 वर्षीय उच्चशिक्षित मुलीच्या अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. ती कुठे गेली, कशी गेली, याचा शोध घेत असतानाच गावात ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची चर्चा सुरू झाली. हे समजताच मुलीच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. मानसिक नैराश्यातून तिने विष प्राशन करून आत्महत्या केली.
घटनेनंतर तातडीने तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, मुलगी काही वेळातच आपल्या प्रियकरासोबत जवळच्या पोलीस ठाण्यात हजर झाली. तिने प्रियकरासोबत आपला विवाह झाल्याची माहिती दिली. पोलीस प्रशासनाने तत्काळ तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत तिच्या आईचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.
या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. एका प्रेमविवाहाने एका आईचा जीव घेतल्याची चर्चा सर्वत्र आहे.
ही घटना पालक आणि समाजातील बदलत्या मानसिकतेचा आरसा असल्याचे निरीक्षक व्यक्त करत आहेत. पालक आणि मुलांमधील संवादाची गरज यामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading