चंद्रपूर जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेसचे दोन दिग्गज रिंगणात; वडेट्टीवार आणि धानोरकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल
📅 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | चंद्रपूर
१३ वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसचे वेटन दिग्गज आमने-सामने!
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, काँग्रेसचे दोन मोठे चेहरे – आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर – थेट रिंगणात उतरले आहेत. यामुळेच निवडणुकीच्या वातावरणात चुरस शिगेला पोहोचली आहे.
विधानसभा आणि लोकसभा – दोन्हीचे प्रतिनिधी मैदानात
विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते आणि राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सिंदेवाही तालुक्यातून "अ" गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी आणि "ब" गटातील दोन वेगवेगळ्या जागांसाठी अर्ज दाखल करून राजकीय रंगत वाढवली आहे.
६१ उमेदवार रिंगणात, २१ जागांसाठी स्पर्धा
या निवडणुकीत ९५० मतदार २१ संचालकांची निवड करणार आहेत. ११ जून ही नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती आणि आतापर्यंत तब्बल ६१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक १० जुलै रोजी पार पडणार असून, प्रचंड चुरशीची लढत अपेक्षित आहे.
बँकेवर वर्चस्वासाठी राजकीय रस्सीखेच
जिल्हा बँकेच्या विद्यमान कार्यकाळात मोठ्या प्रमाणात नोकरभरती झाल्याने या बँकेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळेच काँग्रेसच्या दोन दिग्गजांनी थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading