चंद्रपूर : तेलंगणा व आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचा तांदूळ चंद्रपूर जिल्ह्यात आणला जात असल्याची गंभीर बाब अलीकडेच उघडकीस आली आहे. या प्रकरणात अनेक राईस मिल मालकांनी सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत मिळणाऱ्या तांदळाचा गैरवापर करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे.
यात विशेष म्हणजे, गरीब व गरजू लोकांना स्वस्त दरात मिळणारा तांदूळ परत त्यांच्याकडून खरेदी केला जातो आणि नंतर तोच तांदूळ स्थानिक राईस मिल मालकांना विकला जातो. या प्रकारातून एक संगठित रॅकेट जिल्ह्यात कार्यरत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
या संदर्भात एक मोठी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बिनबा गेट परिसरातील ताज एंटरप्राईजेस समोर कारवाई करत १३ टन तांदूळ जप्त करण्यात आला आहे, ज्याची एकूण किंमत ३ लाख ९० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
विशेष बाब म्हणजे, हा तांदूळ गडचिरोली जिल्ह्यातील वडसा भागात पाठविण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार केवळ आर्थिक घोटाळा नसून, गरिबांच्या अन्नसुरक्षेवर घाला आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading