Advertisement

स्थानिक बेरोजगारांना उद्योगांमध्ये प्राधान्य द्या – मा.संदीप ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे आग्रही मागणी

मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी अहेरी जिल्हा गडचिरोली 




दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | प्रतिनिधी – अहेरी/गडचिरोली

शिवसेना (शिंदे गट) गडचिरोली-आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख मा.संदीपजी ठाकूर यांनी नुकतीच मुंबई येथे राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगारांच्या रोजगार प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली.

गडचिरोली जिल्हा हा उद्योगविरहीत मानला जात असे, परंतु मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या पालकमंत्री कार्यकाळात जिल्ह्यात लोह प्रकल्पांसारखे महत्वाचे उद्योग सुरू करण्यात आले. मात्र, हे प्रकल्प (सुरजागड, हेडरी – एटापल्ली, कोनसरी – चामोर्शी, वडलापेठ – अहेरी) सुरु असूनही स्थानिक तरुणांना अपेक्षित प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही.

या प्रकल्पांमध्ये जिल्ह्याबाहेरील आणि राज्याबाहेरील व्यक्तींना प्राधान्य दिलं जात असल्याची गंभीर बाब मा.ठाकूर यांनी उद्योगमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. गडचिरोलीतील शिवसैनिक आणि इतर स्थानिक बेरोजगार तरुणांमध्ये यामुळे प्रचंड नाराजी आहे.

या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आपण विशेष लक्ष घालावे आणि कंपन्यांना स्थानिकांना प्राधान्य देण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी मा.ठाकूर यांनी केली.

या निवेदनाची गंभीर दखल घेत उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी लवकरच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे आश्वासन दिले असून, संबंधित प्रश्‍नांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या