Advertisement

घोट तालुका निर्मितीची मागणी तीव्र – भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना स्थानिक नागरिकांचे निवेदन



घोट तालुका निर्मितीची मागणी तीव्र – भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना स्थानिक नागरिकांचे निवेदन

✍️ सुखसागर एम. झाडे

चामोर्शी – घोट परिसरात अंदाजे १७ ग्रामपंचायती असून सुमारे एक लाखाहून अधिक लोकसंख्या वस्ती करते. अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक घोट तालुका निर्मितीची मागणी करत असून वेळोवेळी आंदोलन, निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले जात आहे. मात्र अद्यापही या मागणीवर ठोस निर्णय झाला नाही.

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या आमदार कार्यकाळात शासनाकडे घोट तालुका निर्मितीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. होळी यांना भेटून या मागणीचे निवेदन सादर केले.

नागरिकांचे म्हणणे आहे की, छोट्यामोठ्या शासकीय कामांसाठी आजही चामोर्शीला जावे लागते आणि अनेकदा एका दिवसात काम पूर्ण होत नसल्याने जनतेला रिकाम्या हाताने परतावे लागते. महसुली कामांसाठी दरवेळी होणारी ही त्रासदायक परिस्थिती दूर करण्यासाठी घोट येथे तहसील कार्यालयाची तातडीने गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, घोट परिसरात महसूल विभागाच्या सचिवालयाची इमारत आधीपासून उपलब्ध आहे, जी तहसील कार्यालयासाठी उपयोगात आणता येईल.

या निवेदनावर प्रतिसाद देताना डॉ. होळी यांनी सांगितले की, "घोट तालुका निर्मिती ही येथील जनतेची जुनी आणि रास्त मागणी आहे. माझ्या आमदार कार्यकाळातही यासाठी प्रयत्न केले आहेत आणि पुढेही शासनाकडे हा पाठपुरावा सुरूच राहील," असे आश्वासन त्यांनी दिले.

निवेदन सादर करताना अशोकभाऊ पोरेडीवार, आसिफ सय्यद, अविनाश वडेट्टीवार, विलास उइके, अतुल येनगंटीवार, साईनाथ बुरांडे, रुम्पा शाहा, मंगला कुलसंगे, बाबूराव भोवरे, सचिन साखरकर यांसह अन्य नागरिक उपस्थित होते.


का?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या