दरारा 24 तास न्यूज नेटवर्क ● पोंभुर्णा
पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची इमारत सध्या अतिशय धोकादायक स्थितीत आहे. शाळेच्या भिंतींना ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून, छतावरील स्लॅबमधून गट्टू निघत आहेत. विद्यार्थ्यांनी जेवणासाठी वापरात असलेल्या वरांड्यात साप, विंचू व अन्य किटकांनी आपले वास्तव्य केले आहे. त्यामुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित डी. पाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शाळेची अवस्था दयनीय झाल्यामुळे तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांचे जीवन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर असून, इमारतीची तपासणी करून नव्या इमारतीच्या बांधकामाची प्रक्रिया त्वरीत सुरू करावी, अशी जोरदार मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
शाळेची विदारक परिस्थिती:
- भिंतींना व छताला गंभीर स्वरूपाच्या भेगा.
- वरांड्यात गट्टू निघाल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न.
- जेवणाच्या वेळी साप, विंचू, किटकांचा त्रास.
- विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत घेऊन शाळेत यावे लागत आहे.
शाळा प्रशासन व शिक्षकांनी देखील याबाबत तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पालक व ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे.
"शाळेची इमारत कोसळण्याआधी प्रशासनाने जागे व्हावे. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल," असा ठाम इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित डी. पाल यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading