Advertisement

बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दहा दिवसांपासून ठप्प – नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती


बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दहा दिवसांपासून ठप्प – नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

जुनगाव (नांदगाव)
| प्रतिनिधी
बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या १० ते १२ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसातही पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी भटकंती करावी लागत आहे. या समस्येवर अद्याप कोणताही ठोस उपाय न केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्षानुवर्षे ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने ही योजना सुरू केली होती. गडीसुरला येथील जलशुद्धीकरण केंद्रात वैनगंगा नदीचे पाणी शुद्ध करून गोवर्धन, नांदगाव, बेंबळ, भोसरी, नवेगाव भुजला, कोरंबी, दुगाळा, बाबराडा आदी गावांना पुरवठा केला जातो. मात्र सध्या ही योजना पूर्णतः ठप्प असून नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.

योजनेची मुख्य जलवाहिनी जीर्ण अवस्थेत असून वारंवार पाईपलाईन फुटणे, वाल खराब होणे तसेच विद्युत पुरवठा खंडित होणे अशा समस्यांमुळे ही योजना वर्षातील केवळ काही महिन्यांपुरतीच कार्यरत राहते. परिणामी गावांमध्ये शुद्ध पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

या परिस्थितीला ग्रामपंचायतीचे कारभारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदर योजना तात्काळ सुरू करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी नांदगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विजय जाधव यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या