🫂 वादळी पावसामुळे गरीब शेतकऱ्याचे घर कोसळले; पावसाळ्यात राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण
📍 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
✍️ नांदगाव प्रतिनिधी विजय जाधव
मुल तालुका (जि. चंद्रपूर) — गोवर्धन येथील एका गरीब शेतकऱ्यावर वादळी पावसाने संकटाचा डोंगर कोसळला आहे. गावातील शेतकरी तुलसीदास रंगारी यांचे मागील बाजूचे कवेलूचे घर वादळी वाऱ्याने व मुसळधार पावसामुळे पूर्णतः कोसळले असून, या घटनेने रंगारी कुटुंब उघड्यावर आले आहे.
संपूर्ण संसार उध्वस्त...
तुलसीदास रंगारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या मागील भागातील कवेलू फाटून पूर्ण कोसळले असून, घरात असलेले संसारोपयोगी साहित्य – भांडी, कपडे, अन्नधान्य, झोपी व उशा आदी — सर्व काही नष्ट झाले आहे. या घटनेत कोणीही जीवितहानी झाली नाही हे जरी दिलासादायक असले, तरी तीन लहान मुले व पती-पत्नी असा पाच जणांचा कुटुंब आता अक्षरशः उघड्यावर आले आहे.
पावसाळ्यात राहण्याचा गंभीर प्रश्न
सध्या पावसाळ्याचे जोरदार आगमन झाले असून, दररोज मुसळधार पावसाचा मारा सुरू आहे. अशा स्थितीत या कुटुंबासमोर राहण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. रात्रीच्या वेळी छताशिवाय मुलांना झोपवणे धोकादायक असून, घरात गळती व ढिगाऱ्याखाली अडकलेले साहित्य यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी
आपत्तीग्रस्त शेतकरी तुलसीदास रंगारी यांनी शासन, जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की,
"मी अल्पभूधारक शेतकरी असून, फक्त शेतीवर गुजराण करतो. घर उध्वस्त झाले असून, कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. शासनाने तातडीने मदत करावी."
स्थानिक प्रशासनाचे लक्ष आवश्यक
या घटनेनंतरही अद्याप पर्यंत कोणतेही अधिकृत प्रशासनाचे प्रतिनिधी मदतीसाठी पोहोचले नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. स्थानिक सरपंच, ग्रामसेवक व तहसील प्रशासनाने त्वरीत पंचनामा करून आर्थिक मदत व निवारा योजना अंतर्गत लाभ देणे अत्यंत आवश्यक आहे.
📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
गावगाड्याच्या दुःखद कथा, आम्ही पोहचवतो तुमच्यापर्यंत
0 टिप्पण्या
Thanks for reading