विदर्भाची काशी ‘मार्कंडा’ येथे अवैध दारूचा महापुर – भाविक व ग्रामस्थ त्रस्त
✍️ सुखसागर एम. झाडे
गडचिरोली :
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले मार्कंडा महादेव मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज जिल्ह्यातील तसेच इतर राज्यांमधूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, या पवित्र तीर्थक्षेत्राची ओळख आता अवैध दारूविक्रीमुळे कलुषित होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मार्कंडा परिसरात खुलेआम दारूविक्री सुरू असून यामुळे भाविकांच्या श्रद्धेला धक्का बसत आहे. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू असून, उलट मागील काही वर्षांत त्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. बनावट दारूमुळे तरुण पिढी मृत्यूच्या विळख्यात अडकत आहे. अनेक तरुण या व्यवसायात सामील झाले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याची उदाहरणेही समोर आली आहेत.
दारूमुळे भांडणं, मारामाऱ्या, कौटुंबिक कलह वाढले आहेत. विशेष म्हणजे, मार्कंडा तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये दारूच्या विक्रीमुळे नाराजी पसरली असून, येथे येणाऱ्यांची संख्या घटत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. गावातील तरुण पिढी शिक्षणाऐवजी दारूच्या आहारी जात असून अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
गावातील पोलीस पाटील व पोलीस प्रशासनाकडे मात्र डोळेझाक केल्याचे आरोप होत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असतानाही पोलीस पाटील गावकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी अवैध दारूविक्रीचा धंदा सर्रास सुरू आहे.
काही महिन्यांपूर्वी गावातील सरपंचांनी महिलांना सहभागी करून दारूबंदीची मोहीम हाती घेतली होती, मात्र त्यातून काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे, “या गावाकडे आणि या तीर्थक्षेत्राच्या पवित्रतेकडे प्रशासन कधी लक्ष देणार?” असा प्रश्न ग्रामस्थ व भाविकांमध्ये उपस्थित होत आहे.
👉
0 टिप्पण्या
Thanks for reading