पोंभुर्णा तालुक्यात डेंग्यू, टायफाईड व वायरल फीवरचा प्रादुर्भाव-
नागरिकांना तहसील प्रशासनाकडून सूचना
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, टायफाईड आणि वायरल फीवरचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून जनतेला विशेष सूचना करण्यात आल्या आहेत.
तहसीलदार कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे की नागरिकांनी पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष द्यावे. उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच परिसरात पाणी साचू न देणे, डासांची पैदास होऊ न देणे, ही जबाबदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.
आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की ताप, अंगदुखी, उलटी, सर्दी-खोकला अशी लक्षणे दिसताच विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. मुलं आणि वृद्ध यांची विशेष काळजी घ्यावी, कारण या आजारांचा त्यांच्यावर जास्त परिणाम होण्याची शक्यता असते.
ग्रामपंचायतीमार्फत तालुक्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून आवश्यक औषधे व तपासणीची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्यावर भर द्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तहसीलदार, पोंभुर्णा यांनी आवाहन केले आहे की “आपल्या सामूहिक सहकार्यानेच डेंग्यू, टायफाईड व वायरल फीवरचा फैलाव रोखणे शक्य होईल.”
0 टिप्पण्या
Thanks for reading